Maharashtra Weather: महाराष्ट्रात काही दिवसांपासून पावसात खंड पडला होता परंतु आता पुन्हा हवामान सक्रिय होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने 25 ते 26 जुलै 2025 दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन, धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
पावसाचा प्रभाव आणि क्षेत्र
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात 24 जुलैला कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो, जो 27 जुलैपर्यंत मध्य प्रदेशाकडे जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम पूर्व विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पूर्व मराठवाडा आणि खानदेशातही हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. विशेषतः 26 जुलैला पावसाची तीव्रता जास्त असेल, असे हवामान खात्याने वर्तविण्यात आले आहे.
प्रदेश | पावसाचा अंदाज | जिल्हे |
---|---|---|
पूर्व विदर्भ | मध्यम ते जोरदार पाऊस, पूर संभाव्य | भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ |
कोकण | मध्यम ते मुसळधार पाऊस | रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर |
पश्चिम महाराष्ट्र (घाटमाथा) | जोरदार ते मुसळधार पाऊस, पूर संभाव्य | पुणे, सातारा, नाशिक (घाट परिसर) |
पूर्व मराठवाडा | हलका ते मध्यम पाऊस | बीड, परभणी, हिंगोली |
खानदेश | हलका ते मध्यम पाऊस | नंदुरबार, धुळे, जळगाव |
शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी सूचना
हवामान खात्याने शेतकऱ्यांना सावधनतेचा इशारा दिला आहे. खरीप हंगामातील पेरण्या पावसाअभावी धोक्यात असताना हा पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे. मात्र, पूर आणि पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण आणि पाण्याचा निचरा यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. नागरिकाना वादळी वाऱ्यांदरम्यान झाडांखाली थांबू नये, असे सांगण्यात आले आहे.
सतर्कतेचे आवाहन
हवामान खात्याने कोकण आणि घाटमाथा परिसरातील नागरिकांना अति सतर्क राहण्यास सांगितले आहे, कारण या भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पूर येण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना 25 आणि 26 जुलैला समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण वाऱ्यांचा वेग 40-50 किमी प्रतितास आणि काही ठिकाणी 60 किमी प्रतितासपर्यंत असू शकतो.
सध्याची परिस्थिती
राज्यात यंदा जून ते जुलै दरम्यान काही ठिकाणी अति जास्त, तर काही ठिकाणी कमी पाऊस झाला आहे. विदर्भातील काही भागात पावसाची तूट आहे, तर कोकणात सरासरीपेक्षा 22% जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची ही तूट कमी होण्यास मदत होईल, अशी आशा आहे.
हवामान खात्याच्या मते, पावसाची ही स्थिती 27 जुलैपर्यंत अशीच राहण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी mausam.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.