Maharashtra Dam Water Storage: यंदाच्या पावसाळ्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मे आणि जून महिन्यापासून राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या योग्य वेळेत पूर्ण झाल्याअसून महत्त्वाचे म्हणजे शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेल्या धरणांमध्ये पाण्याची लक्षणीय वाढ झाली आहे. काही धरणे १०० टक्के भरली असून, पावसाळ्याचा बराच कालावधी बाकी आहे. त्यामुळे उर्वरित धरणेही लवकरच पूर्ण क्षमतेने भरतील, अशी आशा आहे. २३ जुलै २०२५ पर्यंतच्या महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.
राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती
महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची आकडेवारी समाधानकारक आहे. मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले जायकवाडी धरण ७८.३४ टक्के भरले असून, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात ९४.७४ टक्के पाणीसाठा आहे, जो शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे. कोयना धरणात ७१.१५ टक्के, गंगापूर धरणात ६१.८७ टक्के, तर खानदेशातील गिरणा धरण ५५.९३ टक्के भरले आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असलेले भंडारदरा धरण ७६.४६ टक्के आणि निळवंडे धरण ८७.१८ टक्के भरले आहे.
नाशिक विभागातील धरणांचा आढावा
दारणा धरण ८२.६१ टक्के, पालखेड धरण ५१ टक्के, हतनूर धरण ३३ टक्के, तर अनेर धरण २९.४१ टक्के भरले आहे. विशेष म्हणजे, पांजरा धरण १०० टक्के भरले आहे. अहमदनगरमधील आढळा, विसापूर आणि सिना ही धरणे पूर्णपणे भरली असून, भोजापूर धरण ९१.६९ टक्के भरले आहे. लवकरच तेही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. डिंभे धरण ७७.१९ टक्के भरले आहे.
ब्रेकिंग न्यूज: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफी लवकरच, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
पुणे विभागातील धरणांची स्थिती
पुणे विभागातील चासकमान धरण ८३.४७ टक्के, पानशेत धरण ८०.८० टक्के, खडकवासला धरण ५३.१२ टक्के आणि मुळशी धरण ७८.०७ टक्के भरले आहे. कोल्हापूरमधील राधानगरी धरण ९२.५९ टक्के आणि अलमट्टी धरण ७६.९१ टक्के भरले आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील चित्र
मराठवाड्याच्या धरणांमधील पाणीसाठा हा चिंताजनक आहे. येलदरी धरण ६१.५ टक्के आणि माजलगाव धरण केवळ १२.४७ टक्के भरले आहे. विदर्भातही काही धरणांमधील पाणीसाठा कमी आहे. काटेपूर्णा धरण ३६.६१ टक्के, खडकपूर्णा धरण १४.२५ टक्के आणि गोसीखुर्द धरण १८.९७ टक्के भरले आहे. मात्र, मांजरा धरण ८४.७३ टक्के भरले आहे, ही बाब काहीशी दिलासादायक आहे.
महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठ्याची सद्यस्थिती पाहता, शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना पाण्याची चिंता कमी झाली आहे. तरीही, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पाणी संवर्धनाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीत पाणीसाठा आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करून या नैसर्गिक संसाधनाचे रक्षण करावे.