Limbu Sheti Success Story: परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील दुधगाव या छोट्याशा गावात राहणाऱ्या रानबा खरात यांनी आपल्या जिद्दीने आणि कष्टाने शेतीत यशाचा नवा पायंडा पाडला आहे. त्यांनी अवघ्या ३० गुंठ्यांवर कागदी लिंबाची शेती करून २०२४-२५ या हंगामात तब्बल तीन लाख रुपयांचा नफा कमावला. त्यांची ही यशोगाथा केवळ त्यांच्या गावापुरती मर्यादित नसून, कमी क्षेत्रात शास्त्रीय पद्धतीने शेती करू इच्छिणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी प्रेरणादायी आहे.
रानबा खरात यांच्याकडे एकूण १.५५ हेक्टर जमीन आहे. त्यापैकी ०.३० हेक्टर म्हणजेच ३० गुंठ्यांवर त्यांनी २०१४-१५ मध्ये ‘रोजगार हमी योजना’ अंतर्गत कागदी लिंबाची लागवड केली. त्यांनी ११० झाडे १८ बाय १८ फूट अंतरावर लावली. सुरुवातीला त्यांनी झाडांची नियमित काळजी घेतली. पाणी, खत व्यवस्थापन, छाटणी आणि रोग नियंत्रण यांवर विशेष लक्ष दिले. यात त्यांना परभणी कृषी विभागाचे सहायक विश्वंभर मोकाशे आणि तालुका कृषी अधिकारी प्रियंका कावरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
चौथ्या वर्षापासून या लिंबाच्या झाडांनी उत्पादन द्यायला सुरुवात केली. रानबा यांनी केवळ लागवड करून थांबले नाहीत, तर त्यांनी बाजारपेठेचा सखोल अभ्यास केला. स्थानिक व्यापाऱ्यांशी संपर्क साधला आणि योग्य वेळी विक्रीचे नियोजन केले. यामुळे २०२४-२५ च्या हंगामात त्यांना ५ टन म्हणजेच सुमारे ५,००० किलो लिंबांचे उत्पादन मिळाले. सध्याच्या बाजारात कागदी लिंबांना प्रति क्विंटल ५,००० ते ६,००० रुपये दर मिळतो. यानुसार त्यांनी तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. विशेष म्हणजे, त्यांचा खर्च कमी राहिला, कारण रोपांची लागवड, खत-पाणी व्यवस्थापन यासाठी ‘रोजगार हमी योजना’ आणि ‘राष्ट्रीय फलोत्पादन अभियान’ यांचा लाभ त्यांना मिळाला.
रानबा खरात यांच्या यशामागे त्यांचा शास्त्रीय दृष्टिकोन आणि शासकीय योजनांचा योग्य वापर हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांनी पारंपरिक पिकांऐवजी फळबाग शेतीचा पर्याय निवडला. कागदी लिंबाची शेती ही कमी देखभालीची, जलसिंचनाखाली चांगले उत्पादन देणारी आणि दीर्घकालीन उत्पन्न देणारी आहे. एकदा खर्च केल्यानंतर ती १० ते १५ वर्षे उत्पन्न देते. रानबा यांनी याचा पुरेपूर फायदा घेतला.
त्यांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले आणि बाजारपेठेची मागणी समजून घेतली. त्यांच्या मते, शेतीत यश मिळवायचे असेल तर शिस्तबद्ध नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा लाभ घेणे गरजेचे आहे. कमी क्षेत्रातही मोठा नफा मिळवता येतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
2 thoughts on “Limbu Sheti Success Story: ३० गुंठ्यांत कागदी लिंबाची शेती करून रानबा खरात यांचा तीन लाखांचा नफा”