Farmer Success Story: सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकंब गावातील खारे बंधूंची शेतीची यशोगाथा प्रत्येक शेतकऱ्यासाठी प्रेरणादायी आहे. राजेंद्र आणि संतोष खारे या दोघांनी मिळून केवळ दीड एकरात 20 लाखांचे केळीचे उत्पादन घेऊन शेतीत यश कशे मिळवायचे यासाठी तंत्रज्ञान आणि नियोजन किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले आहे. त्यांच्या मेहनती, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी भरगोस असे केळीचे उत्पादन घेतले आहे . चला, त्यांच्या यशामागील शेतीचे नियोजन आणि व्यवस्थापन जाणून घेऊया.
खारे बंधूंनी त्यांच्या तीन एकर शेतीपैकी एक एकरात द्राक्ष बाग आणि इतर जोडव्यवसाय केले आहेत. मात्र, दीड एकरात त्यांनी केळी लागवडीवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी दीड एकर जमिनीची नांगरट करून रोटावेटरने भुसभुशीत केली. त्यानंतर सहा बाय पाच फूट अंतरावर ठिबक सिंचनाचा वापर करून 2,000 केळी रोपांची लागवड केली. लागवडीदरम्यान त्यांनी निंबोळी पेंडचा वापर केला आणि पाच ते सहा दिवसांच्या अंतराने दहा ड्रेंचिंगद्वारे खतांचा वापर केला.
केळी लागवडीचे नियोजन आणि व्यवस्थापन
खारे बंधूंनी शेतीसाठी सखोल नियोजन केले. त्यांनी 13 ट्रॉली शेणखत (प्रति ट्रॉली 6,000 रुपये), 8 टन कोंबडी खत, 125 किलो जिओग्रीन, 18:46, आणि एमओपी यांचा बेसल डोस दिला. पुढे खत व्यवस्थापनात त्यांनी 19:19:19, ह्युमिक ऍसिड, फॉस्फरिक ऍसिड, युरिया, एमओपी, फास्टर, 30:35, केलामृत, फ्रुट स्पेशल, कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, मायक्रोन्यूट्रिएंट्स, 13:40:13, 13:00:45, 00:52:34, आणि 00:60:20 यांचा विभागून वापर केला. या नियोजनामुळे केळीच्या झाडांना योग्य पोषण मिळाले आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढली.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बुलढाण्यात चक्काजाम आंदोलन
आर्थिक गणित
खारे बंधूंनी केळी लागवडीसाठी एकूण 2.82 लाख रुपये खर्च केले, ज्यामध्ये खालील खर्च समाविष्ट आहे:
खर्चाचा तपशील | रक्कम (रुपये) |
---|---|
रोपांची लागवड | 44,000 |
ठिबक सिंचन | 35,000 |
शेणखत (13 ट्रॉली) | 78,000 |
बेसल डोस | 20,000 |
विद्राव्य खते | 1,05,000 |
एकूण खर्च | 2,82,000 |
त्यांनी 70 ते 75 टन केळी उत्पादन घेतले. बाजारात प्रति किलो 30 रुपये दराने विक्री केल्यास, त्यांना 21 ते 22.5 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. यातून 2.82 लाख खर्च वजा केल्यास, सुमारे 19 लाख रुपये निव्वळ नफा मिळण्याची शक्यता आहे.
यशामागील रहस्य
खारे बंधूंनी केळी लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. ठिबक सिंचन, सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर, तसेच योग्य वेळी केलेले नियोजन यामुळे त्यांना कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन मिळाले. त्यांनी निर्यातक्षम दर्जाची केळी तयार केली, ज्यामुळे बाजारात चांगला भाव मिळाला. त्यांच्या या यशस्वी शेतीमुळे सोलापूर जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे.
खारे बंधूंची ही यशोगाथा दाखवते की, शेतीत यश मिळवण्यासाठी क्षेत्राचा आकार नव्हे, तर नियोजन, मेहनत आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर महत्त्वाचा आहे. त्यांचे हे यश इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.