Maharashtra Weather: महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात पावसामध्ये खंड पडला होता. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत होत्या, पण आता पुन्हा वातावरण सक्रिय होऊन , गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. काही भागात तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) 26 आणि 27 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते , विशेषतः कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये,त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 26 जुलैला कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आज दुपारी 12 वाजेनंतर 4.8 मीटर उंचीची भरती येऊ शकते. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाऊ नयेअसा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, किनारपट्टीवरील रहिवाशांना सावध राहण्याचे आवाहन आहे.
पुणे आणि सातारा येथील घाटमाथा परिसरातही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सांगलीतही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापूर्वीच अनेक धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. या पावसामुळे धरणांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाने जलसाठ्यांवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा
विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून , भंडारा आणि गडचिरोली जिल्यातऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसामुळे स्थानिक नद्यांना पूर येण्याची भीती आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पावसामागचे कारण काय?
हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे (Depression) आणि महाराष्ट्र-केरळ किनारपट्टीवरील ऑफशोअर ट्रफमुळे पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे 26 आणि 27 जुलैला राज्यात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- किनारपट्टीवरील रहिवासी: भरतीच्या वेळी सतर्क राहा, समुद्रकिनारी जाणे टाळा.
- मच्छीमार: समुद्रात जाण्यापासून पूर्णपणे परावृत्त व्हा.
- नदीकाठच्या गावांतील रहिवासी: पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा.
- सर्वसामान्य नागरिक: पाणी साचणाऱ्या भागातून प्रवास टाळा आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करा.
शेतकऱ्यांसाठी सावधानतेचा इशारा
या पावसामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पिकांचे रक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या लागतील.
हवामान खात्याच्या सूचनांनुसार, पुढील दोन दिवस सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथके सज्ज असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत देण्यासाठी तयार आहेत.